Our Mission

अनेक वर्षांपासून मनात रुजवलेलं एक स्वप्न सत्यात उतरत आहे .एक अशा दवाखान्याची सुरुवात जेथे कोणाचेही उपचार पैशांअभावी थांबणार नाही,जिथे येणाऱ्या प्रत्येक गरजूंना त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता योग्य उपचार मिळेल. आमचे मूळ गाव खिलारवाडी ता. जुन्नर. घराण्याला लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा म्हणजे आमचे चुलते ज्ञानेश्वर माऊली खिलारी व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी यांच्या संस्कारामुळे तसेच आई-वडिलांची शिकवण म्हणूनच लहानपणापासून घरात भगवद्गीतेचे वाचन होत असे. भगवद्गीतेतील कर्म सिद्धांत समाजासाठी एक सखोल आणि व्यावहारिक मार्गदर्शन देतो.हे केवळ एक आध्यात्मिक शिक्षण नसून सामाजिक व्यवस्था सुरळीत चालवण्याचा पाया देखील आहे.गीतेत भगवान श्रीकृष्णाने कर्माच्या विविध पैलुं बद्दल सांगितलेले आहे. गीतेतील कर्माच्या मुळाशी निष्काम कर्म ही संकल्पना आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन | श्रीमत्भगवतगीतां २/४७ सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान| १२/११

व्यक्तीचा अधिकार केवल कर्म करण्यावर आहे त्याच्या फळावर नाही. कर्माचे वर्गीकरण मुख्य तीन प्रकारात होते. १) कर्म -जे कर्म व्यक्ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून करते उदा.स्वतःचे कुटुंब चालवणे . २) विकर्म -ही अशी कार्य आहेत ज्यांचा नकारात्मक परिणाम होतो व जी टाळले पाहिजे उदा. खोटं बोलणे ३) अकर्म -हे कोणत्याही प्रतिसादा शिवाय केलेले कर्म आहे, ज्यात ईश्वरप्रती समर्पणाची भावना असते व हे भक्तीचेच एक रूप आहे.

2009,आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केल्यापासून आजपर्यंत कधीही सैनिक, माजी सैनिक यांच्याकडून तपासणी तर नाहीच नाही परंतु औषधाचे पैसेही कधी घेतले नाहीत. आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा,कुटुंबाचा आणि अगदी प्राणांचाही त्याग करतात.त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच आपण सुरक्षित आणि शांततेत जीवन जगू शकतो. त्यांचे ऋण हे प्रत्येक भारतीयावर आहे आणि ते फेडण्यासाठी व देश सेवेचा एक भाग म्हणून आम्ही हे कार्य सुरू केले आहे.

2020 साली वडिलांना कर्करोगाचे झाले निदान झाले, वय 70 वर्षे,पूर्वी हृदयाची बायपास सर्जरी होऊनही सुदैवाने ऑपरेशन सुखरूप पार पडले नंतर महत्त्वाचा टप्पा होता तो 12 किमोथेरपीचा …या काळात त्यांची मानसिक ताकद आयुर्वेदिक उपचार( औषधे, पंचकर्मे), आहारातील योग्य बदल आणि भगवंताची साथ यामुळे वडिलांचे बारा chemo त्यांना कमीत कमी त्रास होऊन पार पडलेत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवताना बाकीचे रुग्ण व त्यांच्या पीडा यांचाही अनुभव आला. बरेचसे रुग्ण किमोथेरपीच्या त्रासामुळे ती चिकित्सा पूर्ण करु शकत नाही, त्यामुळे आजार फोफावतो व त्या रुग्णाचा बळी जातो. त्यावेळी मनात आले की आपण आयुर्वेद शास्त्रानुसार किमोथेरपीची सायकल पूर्ण करण्यासाठी रुग्णाला मानसिक,शारीरिक ताकद व योग्य आहारीय सल्ला (palliative care) दिला तर बरेचसे रुग्ण त्रास विरहित आयुष्य जगू शकतात.

अनेकदा ग्रामीण भागातील लोक कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना फक्त सामान्य आजार समजतात, त्यामुळे रुग्ण उपचारासाठी उशिरा येतात जेव्हा कर्करोग पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. कर्करोगाचे उपचार अत्यंत खर्चिक असतात त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. भारतामध्ये चांगले कर्करोग उपचार सुविधा मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे, ग्रामीण भागातील लोकांना योग्य उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. धूम्रपान, मद्यपान, अयोग्य आहार या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन जास्त प्रमाणात असल्याने तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाणही जास्त आहे. तसेच, कर्करोगाचे निधन झाल्यावर रुग्ण व त्याच्या कुटुंबाला मोठा मानसिक आणि भावनिक ताण येतो. या काळात त्यांना आधार व समुपदेशाची नितांत गरज असते. थोडक्यात, कर्करोगाशी लढण्यासाठी सर्वसामान्य माणसाला केवळ वैद्यकीय उपचाराचीच नव्हे तर पुरेसे ज्ञान, आयुर्वेदिक उपचार,योग्य आहार व सामाजिक आधाराची ही गरज असते.

अशाचप्रकारे अयोग्यजीवनशैलीमुळे निर्माण होणारे डायबिटीस, स्थौल्य ,वंध्यत्व व इतर दुर्धर व्याधी जसे त्वचारोग,संधिवात,पक्षाघात, ऑटिसम ,मूत्रपिंडाचे विकार यातही आयुर्वेदीय चिकित्सेचा अतिशय चांगला उपयोग होते. याची प्रचिती ग्रामीण भागातील रुग्णांना व्हावी हे ध्येय आहे. आपलं शिक्षण आणि आपलं ज्ञान हे केवळ सीमित लोकांसाठी नाहीच तर समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे, याचाच विचार करून ग्रामीण भागातील लोकांना आयुर्वेदाचे ज्ञान व्हावे व “एका इंजेक्शन बरे वाटते” या विचारसरणीतून त्यांना बाहेर पडता तसेच आयुर्वेदिक उपचार म्हटले की खर्च आला कारण केमिकल औषधांसारखे आयुर्वेदिक औषधे हव्या तितक्या प्रमाणात बनवणे अशक्य आहे म्हणूनच औषधांची किंमत वाढते.

सामान्य लोकांना आयुर्वेदिक औषध अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आलेल्या अनुभवातून प्रेरणा घेऊन आम्ही म्हणजेच डॉ. प्रभात खिलारी व सौ.डॉ. स्नेहल आहेर- खिलारी यांनी “स्नेहप्रभा” फाउंडेशन ची सुरुवात केली आहे. या कार्यासाठी तुम्हा सगळ्यांचे शुभाशिर्वाद असावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद.

- सौ. डॉ. स्नेहल आहेर-खिलारी